Sunday, May 10, 2020

आठवण

आठवण

आठवण येते कधी मला
आणि गालावर खुदकन खळी पाडते...
तर कधी हसता हसता
डोळी माझ्या पाणी आणते...

गर्दीत राहून सुध्दा ती
एकांताचा भास देते...
अन एकांतात गेली तरी मला
नाही कधी एकटे सोडते...

डोळे बंद केल्यावर
नवे जग दाखवते...
अन डोळे उघडले
तरी धुंद करून टाकते...

दूर लोटायचा प्रयत्न केला
तर अधिकच जवळ येवून बसते...
जवळ तिला बोलावले तर मात्र
कोपऱ्यात कुठे दडून बसते...

हिच आहे माझी खरी मैत्रीण
नेहमी साथ देणारी...
आंगतुक असली तरी
हवी हवीशी वाटणारी...


     
आईच्या प्रेमाला मोल नाही

       आईच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगविजेता सिकंदर हा देखील आपल्या आईसमोर नतमस्तक होत असे. वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच दिसून येते, त्यात गरीब-श्रीमंत श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नसतो. आईच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणीही नसतात.
  
      एखादी श्रीमंत माता आपल्या मुलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढया महाग किमतीच्या वस्तू आणून देईल, तेवढ्या भारी वस्तू गरीब माता आपल्या लेकराला देऊ शकणार नाही हे खरे पण म्हणून काही तिच्या प्रेमाचे मोल कमी ठरणार नाही. वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या ओळखीची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते मात्र आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरविते. प्रसंगी अपत्य रक्षणासाठी आई आपल्या प्राणांची ही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरुज.

      आई आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती त्याला जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनाचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते त्याचबरोबर त्याला नितीकथा, चतुर्यकथा, सांगून ती त्याचे कोमल मन फुलविते आणि त्यावर सुसंस्कार करते. मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या दुर्देवी बालकाला ह्या साऱ्या सौभाग्याला वंचीत व्हावे लागते. शिवबा, विनोबा यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मतेलाच दिले आहे.

        अपंग, मतिमंद कसेही बालक असले तरी ती आपली माया कमी करीत नाही. किंबहुना अशा बालकाबद्दल तिला वाटणारा कळवळा अधिकच उत्कट असतो.

         आईशिवाय दुर्गुणी मुलाचा अन्य कोणी वाली नसतो. घरोघरी सर्वत्र त्याला अपमानित करतात. प्रत्यक्ष जन्मदाता पिताही त्याला घराबाहेर काढतो. अशा वेळी ती आई मात्र आपल्या मुला जवळ करते म्हणून तर म्हणतात.
           
           "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी"

         आईचे हे अनेक उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आईचे कृपाछत्र एवढे विशाल आई आहे, हे उपकार एवढे आहेत की सात जन्म काय शंभर वेळाजन्म घेऊन ही ते फिटणार नाहीत.  
   
          जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात सदैव करीत असते.